Biography of babasaheb ambedkar in marathi

नाव भीमराव रामजी आंबेडकर (सकपाळ)
जन्मस्थान महू – मध्य प्रदेश
मुळगाव आंबावाडे रत्नागिरी
वडिलांचे नाव रामजी सकपाळ
आईचे नाव भिमाबाई सकपाळ
पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर (विवाह १९०६ – मृत्यू १९३५)
सविता आंबेडकर (विवाह १९४८ – मृत्यू २००३)
अपत्य यशवंत आंबेडकर
धर्म आधी महार हिंदू
धर्मांतरानंतर बौद्ध
पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर
महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ दिल्ली

मुद्दे

युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व

डॉ.

बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पददलित समाजाचे सर्वश्रेष्ठ नेते होत. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला व विद्याभ्यासात सतत रममाण होणारा विद्वान, अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्यास अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज करणारा बंडखोर नेता, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडित अशा विविध नात्यांनी ते भारतीय जनतेला परिचित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक नेते म्हणून ओळखले जातात.

हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय समाजव्यवस्थेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होते.

अल्प परिचय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय.

बाबासाहेबांचे वडील लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे चौदावे अपत्य होते. त्यांपैकी गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा या मुली आणि बाळाराम, आनंदराव व भीमराव हे मुलं जगली.

भीमराव सगळ्यात लहान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दापोली, सातारा व मुंबई या ठिकाणी झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून ते १९०७ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म महार जातीत झाला असल्याने त्यांना अगदी बालपणापासूनच अस्पृश्यतेचे चटके बसले होते.

शैक्षणिक जीवनात त्यांना अनेक प्रकारच्या कटू अनुभवांतून जावे लागले होते. वर्गातील बरोबरीच्या मुलांकडून त्यांना अवहेलना सहन करावी लागली होती. सातारा येथील शाळेत शिकत असताना त्यांनी संस्कृत विषय घेण्याचे ठरविले; परंतु त्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकाने ‘मी महाराच्या मुलाला संस्कृत शिकविणार नाही,’ असे सांगून त्यांचा मनोभंग केला.

त्या प्रसंगी बाबासाहेबांच्या संवेदनक्षम मनाला किती यातना झाल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो.

व्हॉट्सअॅप चॅनल जॉइन करा

व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करा

मॅट्रिक झाल्यावर बाबासाहेबांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजच्या शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली.

नोव्हेंबर, १९१२ मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजातून बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

जून, १९१३ मध्ये आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. या प्रसंगीही त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांनी आर्थिक साहाय्य केले, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले.

सन १९९५ मध्ये त्यांनी ‘प्राचीन भारतातील व्यापार‘ या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. ची पदवी संपादन केली. पुढे १९१६ मध्ये सादर केलेल्या त्यांच्या ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड अॅनॅलिटिकल स्टडी‘ या प्रबंधाबद्दल १९२५ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएच.

डी. ही पदवी बहाल केली.

अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदा व अर्थशास्त्र यांचे अध्ययन करण्यासाठी इंग्लंडला गेले; परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडून २१ ऑगस्ट, १९१७ रोजी ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली; पण तेथे आलेल्या कटू अनुभवांमुळे त्यांनी आपल्या नोकरीचा त्याग केला.

१० नोव्हेंबर, १९१८ रोजी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एक वर्षासाठी त्यांची अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

मूकनायक’ पाक्षिक ‘

याच सुमारास बाबासाहेबांनी सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. ३१ जानेवारी, १९२० रोजी त्यांनी ‘मूकनायक‘ हे पाक्षिक सुरू केले. तसेच माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यतानिवारण परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला.

२० व २१ मार्च, १९२० रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता-निवारण परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करताना राजर्षी शाहू महाराजांनी उद्‌गार काढले होते की, “माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.

इतकेच नव्हे तर, अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते.” शाहू महाराजांची ही भविष्यवाणी पुढील काळात तंतोतंत खरी ठरली. ‘

दि प्रॉब्लेम ऑफ रुपी

५ जुलै, १९२० रोजी डॉ. आंबेडकर आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी प्रथम अर्थशास्त्रामध्ये बी.

एस्सी. ची पदवी संपादन केली. त्यानंतर ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या प्रबंधाबद्दल त्यांना लंडन विद्यापीठाने डी. एस्सी. ही पदवी प्रदान केली. याच वास्तव्यात ते बार अॅट लॉची परीक्षाही उत्तीर्ण झाले. एप्रिल, १९२३ मध्ये ते मायदेशी परतले.

‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना

इंग्लंडहून भारतात आल्यावर डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांनी परत एकदा आपल्या सार्वजनिक कार्याला जोमाने सुरुवात केली. अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी २० जुलै, १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा‘ या संस्थेची स्थापना केली. जानेवारी, १९२७ मध्ये त्यांची मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. भारताच्या घटनात्मक प्रश्नांसंबंधी विचार करण्यासाठी इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले होते.

अस्पृश्यांच्या हक्कांसाठी संघर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यास शिकविले. अस्पृश्य हेदेखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाहीइतकाच अस्पृश्यांचाही अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

३ एप्रिल, १९२७ रोजी त्यांनी ‘बहिष्कृत भारत‘ हे पाक्षिक सुरू केले.

अस्पृश्य बांधवांवर शतकानुशतके होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच तथाकथित सवर्ण गणल्या जाणाऱ्या हिंदूंकडून होत असलेल्या विपर्यस्त प्रचारास सडेतोड उत्तर देण्याचे कार्य या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केले. १५ नोव्हेंबर, १९२९ पर्यंत हे पाक्षिक सुरू होते.

अस्पृश्यतेतून निर्माण होणारे दुःख व वेदना बाबासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या.

साहजिकच, अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे मन पेटून उठले. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या कार्याला सर्वाधिक महत्त्व दिले.

इतर समाजासाठी काय केलं?

जरी भारतात अन्याय फक्त दलितांवर होत आहे असं म्हणत असले तरी अन्याय हा उच्चवर्णीय घरातील स्त्रियांवर पण होत होता. याचं उदाहरण म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं.

सोबतच इतर खूप हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले होते. यासाठी पण त्यांनी काम केलं. स्त्रियांना परत शिक्षणाचे हक्क मिळवून दिले. शिवाय त्यांना नंतर नोकरीत काही अडथळा होऊ नये म्हणून त्यांना तिथेही आरक्षण दिलं. त्यामुळे फक्त दलितांचे बाबासाहेब असं म्हणून चालणार नाही. त्यांनी त्यांना आरक्षण दिलं ज्यांना गरज होती.

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह

डॉ.

बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी जो व्यापक लढा उभारला त्याची सुरुवात महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने झाली. महाड या गावातील तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेथील नगरपालिकेने एक ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी खुले केले; परंतु तरीही तथाकथित सवर्ण हिंदूंनी या तळ्यावर पाणी भरण्यास अस्पृश्यांना विरोध केला. त्यामुळे २० मार्च, १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह करून त्या तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे, याची डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जाणीव करून दिली.

‘मनुस्मृती’चे दहन :

‘मनुस्मृती’ या हिंदू धर्मग्रंथाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन करून पर्यायाने सामाजिक विषमतेला व त्यावर आधारित जातिव्यवस्थेला आधार प्राप्त करून दिला होता. तेव्हा सामाजिक विषमता व उच्च-नीच भेदभाव यांचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाचा प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी बाबासाहेबांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी ‘मनुस्मृती‘चे जाहीररीत्या दहन केले.

मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह:

हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना मंदिर-प्रवेशाचा हक्कही नाकारला होता, याबाबत डॉ.

बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांचीही आहे; म्हणून मंदिरप्रवेशाचा आमचा हक्क मान्य झालाच पाहिजे. हा हक्क सिद्ध करण्यासाठी त्यांनी नाशिक येथे आपल्या हजारो अनुयायांसमवेत ३ मार्च, १९३० रोजी काळाराम मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह केला. (मंदिरप्रवेश सत्याग्रहाची नियोजित तारीख २ मार्च होती; परंतु, प्रत्यक्षात सत्याग्रह ३ मार्च रोजी झाला, हे या ठिकाणी लक्षात ठेवावे.)

डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील सर्व कृतींना प्रतीकात्मक अर्थ होता. त्याद्वारे त्यांना हे दाखवून द्यावयाचे होते, की उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले असले तरी यापुढे अस्पृश्य बांधव हा अन्याय सहन करणार नाहीत. ते आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी संघर्षदेखील करतील; पण आपले हक्क मिळविल्याखेरीज ते स्वस्थ बसणार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा कृतींतूनच अस्पृश्यांची अस्मिता जागी झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतराचा निर्णय

हिंदू धर्माने अस्पृश्यांना न्याय द्यावा याकरिता आंबेडकरांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले तरी येथील सवर्ण हिंदूंच्या वृत्तीत फारसा फरक पडला नाही. या अनुभवावरून त्यांची अशी खात्री पटली की, सवर्ण हिंदूंकडून अस्पृश्यांना कधीच न्याय मिळणार नाही.

त्यातूनच त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरासाठी बौद्ध धर्माची निवड करण्यातदेखील आंबेडकरांचे दूरदर्शित्व व राष्ट्रहिताची तळमळ यांचे दर्शन होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय कार्य

डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजकारणातही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. १७ ऑगस्ट, १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी ‘जातीय निवाडा‘ जाहीर करून आंबेडकरांची वरील मागणी मान्य केली.

पुणे करार

महात्मा गांधींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता.

स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल, असे त्यांना वाटत होते; त्यामुळे जातीय निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. या प्रसंगी गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तडजोडीला तयार झाले. त्यानुसार महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात २४-२५ सप्टेंबर, १९३२ रोजी एक करार झाला.

हा करार ‘पुणे करार’ किंवा ‘येरवडा करार’ या नावाने ओळखला जातो.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घराचे फोटो

रूढाधनि हा करार गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील करार म्हणून ओळखला जात असला तरी, प्रत्यक्षात या कराराचे स्वरूप अधिक व्यापक होते, असे म्हणावे लागेल.

या करारावर डॉ. आंबेडकरांसह एम. सी. राजा, श्रीनिवासन, बापूसाहेब राजभोज, ग. आ. गवई यांसारख्या दलित नेत्यांनी तद्वतच पं. मदनमोहन मालवीय, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पं. हृदयनाथ कुंडारू, सप्रू यांसारख्या उदारमतवादी नेत्यांच्याही या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. यावरूनच या कराराची व्यापकता लक्षात यावी.

गमतीचा भाग असा की, गांधी-आंबेडकर करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारावर गांधीजींची स्वाक्षरीच नाही!

या करारान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात राखीव जागा असाव्यात, असे उभयपक्षी मान्य करण्यात आले.

ऑगस्ट, १९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्वतंत्र मजूर पक्षा‘ची रूपरेषा निश्चित केली. १५ ऑगस्ट, १९३६ रोजी या पक्षाची ध्येयधोरणे निश्चित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

अतएव ऑगस्ट, १९३६ मध्ये ‘मजूर पक्षाची स्थापना‘ करण्यात आली, असे म्हणता येईल. १९ जुलै, १९४२ मध्ये त्यांनी ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन‘ नावाचा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांच्या हितसंरक्षणाचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.

गूगल मॅप वर जाऊन तुम्ही तिथले फोटो पाहू शकता.

शिवाय तेथील रस्त्याचा 3d व्यू पण तुम्ही पाहू शकता.

भारतीय घटनेचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीचे सभासद होते. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि त्यायोगे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला; म्हणूनच ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार‘ अशा शब्दांत त्यांचा उचित गौरव केला जातो.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन कायदा खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. केंद्रीय कायदामंत्री या नात्याने त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ‘हिंदू कोड बिल‘ तयार केले. पंडित नेहरूंनीदेखील या बिलाची प्रशंसा केली होती. हिंदू धर्म व हिंदू समाज यांत सुधारणा घडवून आणण्याचा डॉ.

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला तो अखेरचा प्रयत्न होता; परंतु त्यांच्या या महान क्रांतिकार्याला काँग्रेसमधील प्रतिगामी गटाने विरोध केला. हा विरोध पाहून नेहरूंनीही माघार घेतली; त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचे त्यागपत्र दिले.

स्वातंत्र्योत्तर काळात सर्व पददलित वर्गांचे प्रतिनिधित्व करणारा, व्यापक पायावर आधारित भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची त्यांची योजना होती; परंतु या योजनेला मूर्त स्वरूप मिळण्यापूर्वीच त्यांचा अंत झाला.

पुढे त्यांच्या अनुयायांनी ‘रिपब्लिकन पक्षा‘ची स्थापना केली.

बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य

अस्पृश्यांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची उन्नती होऊ शकणार नाही, हे बाबासाहेबांनी ओळखले होते; म्हणूनच त्यांनी शिक्षणप्रसाराच्या कार्यातही लक्ष घातले होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुण व प्रौढ व्यक्तींसाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरू करणे यांसारखे उपक्रम हाती घेण्यात आले होते.

सन १९४६ मध्ये आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी‘ या संस्थेची स्थापना केली.

तिच्या वतीने मुंबईत सिद्धार्थ कॉलेज (स्थापना : २० जून, १९४६), छ. संभाजीनगरला मिलिंद कॉलेज ही महाविद्यालये, तसेच इतर शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या होत्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने दलित विद्यार्थ्यांसाठी काही वसतिगृहेही चालविली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्यास इतिहासात तोड नाही.

आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय्य हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी तयार केले. अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली. त्याचबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाचीही फार मोठी सेवा केली.

बाबासाहेबांच्या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा योग साधून १४ एप्रिल, १९९० रोजी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

सन १९५४ ते १९५५ च्या दरम्यान त्यांची प्रकृती खूप खालावली होती. मधुमेह, अंधुक दृष्टी आणि इतर आजारांनी त्यांना ग्रासले होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता महापरिनिर्वाण झाले.

यावेळी ते दिल्लीत होते. विशेष विमानाच्या सहाय्याने त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला आणले. त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तके

हू वेअर दी शूद्राज?, बुद्ध अँड हिज धम्म, द अन्टचेबल्स, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी (अर्थशास्त्रविषयक प्रबंध), रिडल्स इन हिंदुइझम, थॉट्स ऑन पाकिस्तान, महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्टेट्स अँड मायनॉरिटीज इत्यादी

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा.

तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन.

धन्यवाद!

व्हॉट्सअॅप चॅनल जॉइन करा

व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करा

Categories जीवनचरित्रTags ambedkar bhimrav, babasaheb, आंबेडकर, बाबासाहेब, भीमराव